breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी मोदी करणार का? विजयाची गुरुकिल्ली या राज्यांच्या हाती!

मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 च्या सहा टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. 1 मे रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे सर्व नेते यावेळी 400 हून अधिक जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. तर, विरोधी इंडिया आघाडीदेखील आपल्याच विजयाचा दावा करत आहे. देशात सत्ता मिळवण्यासाठी 272 जागा जिंकण्याची आवश्यकता आहे. भारताशिवाय अमेरिका आणि अन्य देशांमध्ये बहुमताचे गणित फार वेगळे आहे. अखेर, देशात सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचे गणित काय आहे? देशाचे पहिले पंतप्रधान नेहरू यांच्या विक्रमाची मोदी बरोबरी करू शकतील का? बहुमताची किल्ली हाती असणारी ती चार महत्वाची राज्ये कोणती आहेत?

जगातील सर्वात जुनी लोकशाही असलेला देश म्हणजे अमेरिका. 2016 मध्ये यूएसच्या अध्यक्षपदासाठी निवडणुक झाली. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटनचा पराभव केला. वास्तविक ट्रम्प यांच्यापेक्षा अधिक अमेरिकन लोकांनी क्लिंटन यांना मतदान केले होते. परंतु, मिशिगन, विस्कॉन्सिन आणि पेनसिल्व्हेनिया या तीन प्रमुख स्विंग राज्यांमध्ये अतिरिक्त 77,744 मते मिळवून ट्रम्प विजयी झाले. आताही 2024 मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक होणार आहे. ही निवडणूक ॲरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा, पेनसिल्व्हेनिया आणि विस्कॉन्सिन या सहा राज्यांवर अवलंबून असेल. या सहा ‘स्विंग स्टेट्स’मध्ये कोणाला बहुमत मिळते यावर पुढील अध्यक्ष कोण होणे हे अवलंबून असेल.

भारतातही साधारण अशीच काही परिस्थिती आहे. जिथे ‘बहुमत मिळवणे’ काही राज्यांवर अवलंबून असते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर 2019 मध्ये भाजपने लोकसभेच्या 543 पैकी 303 जागा जिंकल्या. राजकीय नकाशावर नजर टाकल्यास 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप नेतृत्वाखालील NDA आघाडीच्या विजयाची मूळ कल्पना येते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करेल, त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करेल की बहुमत गमावेल? देशातील 28 पैकी फक्त चार राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये भाजपला किती जागा मिळतात यावर ते अवलंबून आहे.

देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपला अजूनही संघर्ष करावा लागत आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि तेलंगणा या दक्षिणेकडील चार राज्यांमध्ये भाजपला अजूनही म्हणावा तसा आपला ठसा उमटविता आला नाही. गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपला 101 जागांपैकी केवळ चार जागा जिंकता आल्या होत्या. आता तीच परंपरा कायम रहाणार की भाजपच्या जागा वाढणार हे महत्वाचे ठरणार आहे. यातील तेलंगणा राज्यात भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. निवडणुकीमध्ये एक साधा फॉर्म्युला वापरण्यात येतो. यासाठी राज्यांची तीन श्रेणीत विभागणी करण्यात येते. पहिला म्हणजे ज्या राज्यांमध्ये भाजप मुख्यत्वेकरून निवडणूक लढत नाही. दुसरा प्रकार जिथे भाजपचे पूर्ण वर्चस्व आहे तर तिसरा प्रकार म्हणजे अशी राज्ये जिथे प्रादेशिक पक्षांविरोधात भाजपची चुरशीची लढत आहे.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपची थेट लढत काँग्रेस विरोधात होत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 190 जागांवर भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेस होता. यातील 175 जागा भाजपने जिंकल्या. तर, काँग्रेसला केवळ 15 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपने जिंकलेल्या 175 जागांपैकी 144 जागा 10% पेक्षा जास्त फरकाने जिंकल्या होत्या. तर, प्रमुख 8 राज्यात काँग्रेससोबतच्या लढाईत भाजपने 2019 मध्ये 138 पैकी 133 आणि 2014 मध्ये 138 पैकी 121 जागा जिंकल्या होत्या. 2024 च्या निवडणुकीत भाजपला कर्नाटक आणि अन्य राज्यांत काही जागा गमवाव्या लागतील. परंतु. काँग्रेससोबत होणाऱ्या थेट लढतीत भाजपला परिणामकारक नुकसान होण्याची तशी शक्यता नाहीच.

देशातील सहा राज्यांमध्ये असलेल्या एकूण जागा देशाची सत्ता कुणाकडे सोपविणार याचा निर्णय घेत असतात. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, पंजाब, ओडीसा ही सहा राज्ये महत्वाची भूमिका ठरवितात. उत्तर प्रदेशमध्ये भाजपची स्थिती खूप मजबूत आहे. 2014 मध्ये समाजवादी पक्ष (एसपी) आणि बहुजन समाज पक्ष (बसपा) यांनी स्वतंत्र निवडणुका लढविल्या होत्या. त्यावेळी भाजपने 71 जागा जिंकून युपी काबीज केला होता. तर पंजाबमध्ये भाजप हा मोठा पक्ष नाही. त्यामुळे उरलेली चार राज्ये म्हणजेच महाराष्ट्र (48 ), पश्चिम बंगाल (42), बिहार (40) आणि ओडिशा (21) याकडे भाजपचे लक्ष अधिक असेल.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत या चार राज्यातील एकूण 151 जागांपैकी भाजपने 66 जागा जिंकल्या. पण, यावेळी महाराष्ट्रात दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी आहेत. महाराष्ट्रातील या दुहीचा भाजपला फायदा होईल की नुकसान होईल, हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. बिहारमध्ये आरजेडीसोबतचा दुसरी टर्म पूर्ण केल्यानंतर नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये आले आहेत. याचा मतदारांवर काय परिणाम होईल? त्याचवेळी, पश्चिम बंगालमध्ये 2021 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेससोबत चुरशीची लढत होत आहे. ओडिशात भाजप आणि बिजू जनता दल (बीजेडी) यांच्यात युती झाल्याची चर्चा होती. मात्र, आता दोघेही एकमेकांविरुद्ध थेट लढत आहेत.

देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सलग तीन लोकसभा निवडणुका जिंकल्या होत्या. त्यांच्या या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सज्ज झाले आहेत. पण, त्यांच्या मार्गात ही चार राज्ये प्रमुख अडसर ठरणारी आहेत. सहा प्रमुख राज्यांमध्ये एकूण 244 जागा आहेत. येथे भाजपची स्पर्धा थेट प्रादेशिक पक्षांशी आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि ओडिशा या चार राज्यांच्या निकालांवरून लोकसभा निवडणुकीतील बहुमताचा जनादेश आणि निकाल निश्चित केला जाईल. त्यामुळे पंतप्रधान मोदी नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी करू शकतील का? ही चार राज्ये या ऐतिहासिक घटनेचा निर्णय घेऊ शकतात का? याचे उत्तर मात्र 4 जूनला मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button